
गरिबांच्या हक्काच्या घरासाठी आ. श्वेता महाले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश…
आ. सौ. श्वेताताई महाले यांनी
चिखली मतदारसंघातील घरकुल निर्मितीसाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, महसूल अधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांची संयुक्त बैठक घेऊन शासन निर्णयानुसार येत्या 10 जूनपर्यंत योग्य नियोजन करावे आणि चिखली मतदारसंघातील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी आणि यात हलगर्जीपणा होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निर्देश व सूचना आज प्रशासनाला दिल्या.

⦿ घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत: वाळूघाटांचा लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे शासन निर्णयानुसार 5 ब्रास वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्यामुळे त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत व पैशाचीही बचत होणार आहे. परंतु सध्या चिखली परिसरात पावसाने जोर धरल्याने शेतकरी व लाभार्थी चिंताग्रस्त असून वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्राधान्याने व योग्य नियोजन करून पार पाडावी, असे आदेश आ. सौ. श्वेता महाले यांनी दिले.याचा फायदा प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना तसेच इतर घरकुल योजनामधील सुमारे 10000 घरकुल लाभर्थ्यांना होणार आहे.

⦿ वाळूचे ई पास मिळणार:ही योजना नियमानुसार व सध्याची नैसर्गिक परिस्थिती बघता विहित कालमर्यादेत करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पाडताना पात्र लाभार्थ्यांनी तलाठी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत किंवा स्वतः आधार, मोबाईल व घरकुल मंजुरी यादी क्र. अपलोड केल्यानंतर आणि नजीकचा व सोयीचा वाळूघाट पसंतीनुसार नोंद केल्यानंतर मोफत 5 ब्रास वाळूचे ई-पास देण्यात येणार आहेत. वाळूघाटावर लाभार्थीची ओळख पटवून त्यांना वाळू दिली जाणार आहे. घरकुल लाभार्थ्यांची झालेली कामे बघून पाहणी करून तत्काळ हप्ते वर्ग करण्याच्या सूचनाही गटविकास अधिकारी यांना आ. सौ. श्वेता महाले यांनी दिल्या.
⦿ पात्र महिला सत्कार सोहळा आयोजित करा: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त महिलाशक्तीचा जागर घडवण्याच्या दृष्टिकोनातून पात्र महिलांचा यथोचित सत्कार करण्याचेही आ. सौ. श्वेता महाले यांनी आदेशित केले.
⦿ अडचणींचे निवारण,पर्यवेक्षण करा: गावात घर बांधण्यासाठी लाभार्थ्यांना माहिती नसल्याने व निरक्षतेमुळे अनेक अडचणी येतात या अडचणी सोडवण्याकरिता गावनिहाय तलाठी व ग्राम पंचायत अधिकारी यांनी हे काम चोख बजावून पूर्ण करणे व त्यावर मंडळ अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी आढावा घेऊन आलेल्या अडचणींचा निपटारा व पर्यवेक्षण करणे गरजेचे असून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्याचे नियोजन व जबाबदारी पार पाडावी असे निर्देश व सूचना आ. श्वेता. महाले पाटील यांनी दिल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार संतोष काकडे, बुलडाणा तहसीलदार कुमरे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, गटविकास अधिकारी गजानन पोफळे, बुलढाणा साहाय्यक गटविकास अधिकारी एल. पी. सुरडकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख भास्करराव मोरे, सागर पुरोहित शहराध्यक्ष भाजप, संतोष काळे, प्रशांत पाखरे, योगेश जुमडे,पाचफुले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.