
कोणत्या एसपींच्या ऐकावे आणि आता काय करावे? हा मोठा पेच प्रसंग जिल्हा पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकाऱ्यांसमोर येऊन पडला आहे. त्याच कारण ही तस आहे…कारण आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास बदलीला स्थगिती मिळालेले एसपी विश्व पानसरे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या केबिनमध्ये येऊन बसले आणि त्यांनी खुर्चीचा ताबा घेतला.

याच खुर्चीवर बसून नवीन एसपी निलेश तांबे यांनी काल मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. विशेष म्हणजे श्री तांबे आज सकाळी परेडसाठी पण दाखल झाले होते. इकडे मात्र सकाळीच एस पी विश्व पानसरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करून सगळ्यांना धक्का दिला. मागील चार ते पाच दिवसांपासून पानसरे आजारी रजेवर होते.

गृह विभागाने त्यांची बदली अमरावती या ठिकाणी करून त्यांच्या जागी तांबे यांची वर्णी लावली होती. परंतु आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणत एसपी पानसरे यांनी कॅटमध्ये प्रकरण दाखल केले होते. काही तासातच त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती. तेव्हापासून हीच चर्चा सुरू आहे आता नेमके बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कोण कार्यभार सांभाळणार…? तर दुसरीकडे तांबे यांनी रातोरात बुलढाणा गाठून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी मागील तीन ते चार दिवसांपासून कार्यभार ही सुरू केलेला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे एसपी नेमके कोण…? हा प्रश्न जसा पोलीस प्रशासनाला पडलाय तसाच बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा पडला आहे.
मी आज पोलीस अधीक्षक पदाचा पुन्हा प्रभार घेतला असून मी रुजू झालो असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते तसंच नवनियुक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या बद्दल विचारलं असता ते त्यांनाच माहिती मला त्याबद्दल माहिती नाही असं त्यांनी सांगितलं…
एकंदरीत सध्या बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांचा हाय व्होल्टेज ड्रामा दिसत असून पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे.
सध्या दोन्ही आयपीएस अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयात असून विश्व पानसरे हे त्यांच्या दालनात बसलेले आहेत तर नवनियुक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाच्या प्रमुखांच्या कार्यालयात बसले आहेत.
