
- १०० टक्के अनुदानीत सोयाबीन बियाण्यांसाठी अर्ज करतांना शेतकर्यांना असंख्य अडचणी
- पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करून मुबलक बियाणे उपलब्ध करा, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्या!
- शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्यांची कृषी विभागाकडे मागणी
चिखली – राज्य शासनाकडून दरवर्षी बियाणे वाटपाचा कार्यक्रम राबविला जातो. यावर्षीसुद्धा खरिप हंगाम २०२५ करिता शासनाकडून १०० टक्के अनुदानावर सोयाबीन, उडीद, मूंग व इतर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर शेतकर्यांनी बियाणे नोंदणीसाठी अर्जदेखील केले. मात्र तांत्रिक अडचणींमुळे शेतकर्यांचे पैसे कटले मात्र पावती निघाली नसल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच, पण पावती नसल्याने बियाणे मिळेल की नाही, ही शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, अर्ज करण्याची मुदत आज,

दि. ३१ मेरोजी संपणार असल्याने असंख्य शेतकरी अनुदानीत बियाण्यांपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आक्रमक पवित्रा घेत, महा-डीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी सोडवण्यात याव्यात, पैसे कटून अर्ज सक्सेस होऊनदेखील पावती मिळाली नसल्याने यावर उपाययोजना करण्यात याव्यात, यासह मुबलक प्रमाणात सोयाबीन व इतर पिकांचे प्रमाणित बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कृषी विभागाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी शेतकर्यांसह तालुका कृषी अधिकार्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. मुदतवाढ देऊन बियाणे न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारादेखील त्यांनी दिला.
खरिप हंगाम २०२५ करिता शासनाकडून १०० टक्के अनुदानावर सोयाबीन, तूर, मूंग, उडीद, बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मात्र या संदर्भात शेतकरी सीएससी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी गेल्यावर या पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अर्ज होतो मात्र पैसे कटूनसुद्धा पावती प्रिंट निघत नसल्याने अर्ज झाला, याची शाश्वती होत नसल्याने शेतकर्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. अनेकांचे दोनवेळा पैसे कटूनसुद्धा पावती निघत नाही. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही ३१ मे २०२५ असल्याने यापूर्वीच शेतकरी अर्ज करु शकले नाही तर अंतिम तारखेत शेतकरी अर्ज करू शकतील का? शेतकर्यांचा अर्ज झाला मात्र पावती मिळाली नाही त्यांची निवडित समावेश होईल का? असा सवाल शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी कृषी विभागाला केला आहे. १०० टक्के अनुदानीत बियाणे नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात, ज्या शेतकर्यांकडे अर्ज नोंदणीचा मॅसेज आहे त्यांना पावती मिळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकर्यांचा डाटा माहिती घेऊनच निवड प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. यासाठी तब्बल दोन तास शेतकर्यांच्या समस्यांचा व तांत्रिक अडचणींचा पाढाच सरनाईक यांनी कृषी विभागासमोर मांडला. यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे गोपाल ढोरे, रवि टाले, गजानन तोरमल, सागर खेंन्ते, ऋषी भोपळे, परमेश्वर ढोरे, औचितराव वाघमारे, रमेश कुटे, स्वप्नील खेंन्ते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकर्यांना अडचणी निर्माण होणार नाही यासाठी बियाणे साठा प्रसिद्ध करण्याची मागणी
मागील वर्षीचा अनुदानीत बियाण्यांचा अनुभव बघता, यामध्ये बियाण्यांचा तुटवडा निर्माण होवून प्राप्त साठा व निवड शेतकरी संख्या बघता, शेतकर्यांचा गोंधळ निर्माण होई शकतो. त्यामुळे महाबीजकडून उपलब्ध बियाणे वितरकांची यादी व निवड झालेल्या शेतकर्यांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणीदेखील शेतकर्यांसह विनायक सरनाईक यांनी केली आहे.
फार्मर आयडी असलेल्यांनासुद्धा उद्भवते तांत्रिक अडचण…
फार्मर आयडी काढणे सुरु असल्याने बियाणे नोंदणीसाठी अडचणी निर्माण होत आहे तर फार्मर आयडीला अप्रुवल नसल्याने अडचणी उद्भवत असल्याचे कारण कृषी विभागाकडून दिले जात आहे. मात्र याबाबत विनायक सरनाईक यांनी तहसीलदार संतोष काकडे यांची भेट घेऊन फार्मर आयडी मान्यता दिलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज करून बघितले तरीसुद्धा पावती मिळत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नेमकी समस्या काय? यावर उपाययोजना करण्यात येईल ,असे अश्वासन तहसीलदार काकडे यांनी दिले आहे