मेहकर फाट्याजवळील हॉटेल मातोश्रीच्या समोर एका कारमधून शस्त्र बाळगल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलीसांनी तात्काळ कारवाई करत पिस्तूलसह एक आरोपीला अटक केली. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी दुपारी 3:10 वाजता मेहकर फाट्याजवळ संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर (क्रमांक MH 14 EU 5917) या वाहनात एक व्यक्ती आढळला. पोलिसांनी तात्काळ वाहनाची झडती घेतली असता, ड्रायव्हर सीटखाली एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीन मिळून आले.
सुरेश कौसनराव चेके (50, रा. वाकी बु., ता. देऊळगाव राजा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडे शस्त्र परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पिस्तूल व कारसह एकूण 3.90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत. शहरात शस्त्रसाठ्याची वाढती प्रकरणे गंभीर चिंतेचा विषय ठरत असून, पोलिसांची ही कारवाई उल्लेखनीय मानली जात आहे.