
शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या आवाहनाला चिखली तालुक्यात जोरदार प्रतिसाद
- चिखली तालुक्यात शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत शेकडोने अर्ज केले दाखल.
गावागावातून अर्जासाठीची वाढली मागणी
चिखली -शेतकरी नेते तथा किसान
ब्रिगेडचे संस्थापक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या मागेल त्याला व गरज त्याला कर्जमुक्ती अंतर्गत कर्जमुक्ती मागणी, बँक कर्ज भरणा वापसी आदि कर्जमुक्ती अर्ज भरण्याच्या आवाहनाला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.जवळपास ८०० शेतकऱ्यांनी आपले कर्जमुक्तीचे अर्ज महसूल प्रशासनाला सादर केले. चिखली तालुक्यात शेतकरी चळवळीत काम करणारे शेतकरी नेते विनायक सरनाईक, डॉ. सत्येंद्र भुसारी,नितीन राजपूत, समाधान गाडेकर, गोपाल ढोरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी आपले अर्ज तहसीलदार संतोष काकडे यांना सादर केले. मी ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे व शेतकरीच आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मला ज्ञात आहेत असे उद्गार काढत तहसीलदार संतोष काकडे यांनी आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन याप्रसंगी शेतकऱ्यांना दिले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी शासनकर्त्याच्या भूमिके विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ज्येष्ठ शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांनी राज्यभर कर्जमुक्ती अर्ज भरण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, मागेल त्यालाच/गरज त्यालाच कर्जमुक्ती अंतर्गत गावागावात शेतकरी अर्ज भरून देत आहेत. सदर मोहीम २० एप्रिल ते १४ मेपर्यत राबविण्यात आली. आज १४मे रोजी चिखली तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडे कर्जमुक्तीचे शेकडो अर्ज शेतकऱ्यांनी सादर केले. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाला कळवू, असे आश्वासन तहसीलदार संतोष काकडे यांनी दिले. या अर्जावर शासनाने कारवाई करून दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र याच अर्जाचा आधार घेऊन न्यायालयाचे दार ठोठवले जाणार असल्याचे यापूर्वीच प्रकाशभाऊ पोहरे यांनी जाहीर केलेले आहे. चिखली तहसीलदारांना अर्ज देतेप्रसंगी चिखली तालुक्यात शेतकरी चळवळीत काम करणारे शेतकरी नेते विनायक सरनाईक, डॉ. सत्येंद्र भुसारी, नितीन राजपूत, समाधान गाडेकर, गोपाल ढोरे यांच्यासह बाळू पाटील, दिनकर ठेंग, मधुकर पवार, परमेश्वर ढोरे, राम भुसारी, प्रल्हाद बोर्डे, मुरली येवले, मुरलीधर गि-हे, छोटू लोखंडे, सचिन सोळंकी, जयवंत सावंत, पंजाबराव सावंत, समाधान गिते, राजेश पवार, संतोष वानखेडे, बाबुराव सावळे, भाऊराव गवई, विनोद सपकाळ, संजय अंभोरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून कर्जमुक्तीचे अर्ज सादर केले. याप्रसंगी यावेळी तहसीलदार संतोष काकडे, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर, गट विकास अधिकारी गजानन पोफळे यांच्यासह अधिकारीदेखील उपस्थित होते.