
स्थानिक आदर्श विद्यालय,चिखली येथे दिनांक ०६ मे २०२५ रोज मंगळवारला शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा पर्यावरण संवर्धन करण्याच्या हेतूने पक्षांसाठी पानवठे (जलपात्र) तसेच घरटे वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये सचिव प्रेमराज भाला, कोषाध्यक्ष ॲड. विजयकुमार कोठारी, सन्माननीय संचालक सर्वश्री सहदेवराव सुरडकर, अमोल खेकाळे, जिल्हा संघचालक सुभाषराव मोरे, पवन लढ्ढा हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कुटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात कुटे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल यामुळे वाढते जागतिक तापमान या गोष्टी आता जगासमोर सर्वात मोठे संकट म्हणून उभ्या ठाकल्या आहेत. हे सर्व वृक्षतोडीमुळे झाले. आणि नैसर्गिक रित्या झाडांची संख्या वाढवणारे पक्षी देखील कमी झाले. अशा पक्षांच्या संवर्धनासाठी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा हा उपक्रम घेण्यात आला असे सांगितले. तसेच ॲड. विजयकुमार कोठारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पक्षी संवर्धनासाठी संस्थेने हाती घेतलेला हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमांतर्गत घरटे प्राप्त करणाऱ्या व्यक्ती, संस्था, शाळा या सर्वांनी स्वतः अशाच प्रकारचे घरटे समाजातील किमान 50 लोकांना वितरित करावे आणि त्या लोकांना परत 50-50 लोकांना अशाच प्रकारचे घरटे वितरित करण्याचे सांगावे. आणि ही साखळी अशीच पुढे अविरत चालू ठेवावी जेणेकरून पक्षी संवर्धन ही चळवळ सर्वसामान्यांची चळवळ म्हणून समाजामध्ये समोर येईल आणि त्यातून जंगलांची नैसर्गिकरित्या वाढ होईल. असेही ॲड.कोठारी यांनी आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे यांनी जल, जमीन आणि जंगले वाचवण्यासाठी पक्षांची भूमिका विशद केली. पक्षी हे स्थलांतर करत असतात. त्यांच्यामार्फत जंगलामध्ये बीजाचे देखील स्थलांतर होते. तसेच पक्षांनी खाल्लेल्या बियांची उगवन शक्तीही जास्त असते. पक्षी जगले तर नैसर्गिक रित्या झाडांची संख्या वाढेल आणि झाडांमुळे जमिनीची धूप थांबेल, जागतिक तापमान देखील कमी होईल व पर्जन्यमानात सकारात्मक बदल आपणास दिसून येईल अशा प्रकारे पक्षी हे जल, जमीन आणि जंगल यांच्या रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे मत यावेळी रामकृष्णदादा शेटे यांनी व्यक्त केले. या घरटे निर्मितीसाठी संस्थेअंतर्गत विविध शाळांमध्ये जे फर्निचर चे काम केले गेले त्यातून उरलेल्या टाकाऊ साहित्यापासून पक्षांसाठी हे घरटे बनवण्यात आले. यामध्ये आदर्श विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले, उपप्राचार्य भगवान आरसोडे यांच्या मार्गदर्शनात कलाशिक्षक गणेश अंभोरे, गजानन काळे, मंगेश कापसे, विकास जाधव, योगेश कुलवंत, विनोद कुटे, विशाल कुरकुटे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक,शिक्षिका, कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास जाधव यांनी तर आभार प्रदर्शन गजानन काळे यांनी केले.
Show quoted text