
- उर्वरित शेतकर्यांचा पीकविमा द्या, तुटपुंजी रक्कम दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा!
- न्याय मिळेपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांच्यासह शेतकर्यांची आक्रमक भूमिका!
चार तासांपासून कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा राडा…
चिखली – उर्वरीत शेतकर्यांचे पीकविम्याचे पैसे टाका,नाहीतर विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्यासह देऊळगाव घुबे येथील शेतकर्यांनी चिखली येथील कृषी कार्यालयाचा ताबा घेतला असून, ठिय्या मांडला आहे.चार तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे.

चिखली तालुक्यातील शेतकर्यांनी सन २०२३ व २०२४ मध्ये पीकविमा काढला होता. त्याबाबत खरीप व रब्बीमध्ये शेतीपिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आत व एॅप बंद असल्याने आयुक्तांच्या आदेशाचे पालन करीत ऑनलाईन तक्रार दाखल केल्या होत्या. या संदर्भात पंचनामे करण्यात आले तर शेतकरी संख्या बघता रँडम पध्दत कृषी विभाग व विमा कंपनीकडून अवलंबविण्यात आली.
असे असतांना चिखली तालुक्यात अनेकांना मोठ्या प्रमाणात रक्कम प्राप्त झाली, मात्र असंख्य शेतकर्यांना अतिशय तुटपुंजी तर एकरी १०००, ५००, २०० अशी रक्कम खात्यावर जमा झाली आहे. विशेष म्हणजे, शिवार एक गट नंबर एक असतांना वेगवेगळी रक्कम खात्यात जमा होणे म्हणजे शेतकर्यांची फसवणूकच आहे.

जी रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा झाली त्यास हेक्टर मर्यादा किती आहे याची विचारणा केल्यास शेतकर्यांना विमा प्रतिनिधी यांच्याकडून सांगितले जाते, की याचे कसलेही नियम निकष नाही. या वरून पीकविमा कंपनीचा कसलाही ताळमेळ नाही, किंवा नियमबाह्य काम झाले आहे, हे स्पष्ट होत आहे.
तेव्हा, चिखली तालुक्यातील रखडलेल्या शेतकर्यांची पीकविमा रक्कम ही मंजूर आहे, परंतु त्यांना प्राप्त नाही, अशा शेतकर्यांना पीकविमा अदा करण्यात यावा, जी रक्कम शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली ती किती रूपये गुंठा किंवा हेक्टरप्रमाणे आहे, याबाबतची प्रसिद्धी करण्यात यावी, ज्या शेतकर्यांनी सर्वे प्रत मागितली त्या शेतकर्यांना सर्वे प्रत देण्यात यावी, मंडळामध्ये ज्या शेतकर्यांस मोठ्या प्रमाणात रक्कम प्राप्त झाली आहे.

त्यानुसार इतर शेतकर्यांस कमी आली असल्याने त्यांची सर्वे प्रत व एकूण क्षेत्र व नुकसानीचे क्षेत्र तपासून तफावत अहवाल तालुका तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून बैठक घेऊन तालुक्यातील कमी रक्कम प्राप्त शेतकर्यांचा अहवाल शासनास पाठविण्यात यावा, पीकविमा कंपनी व संबंधित यंत्रणेने कर्तव्यात कसूर करून व नियमबाह्य काम केले असल्याने याबाबतची चौकशी होवून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे.
उर्वरीत रक्कम मंजूर असून, संपूर्ण शेतकरी पात्र असूनसुद्धा हजारो शेतकरी पीकविमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत, त्या शेतकर्यांना विनाविलंब रक्कम खात्यात जमा करण्यात यावी, अशा मागण्या शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्यासह शेतकर्यांनी केल्या आहेत.
गेल्या चार तासांपासून ठिय्या आंदोलन चालू असून, तालुकाभरातून शेतकरी कृषी कार्यालयाकडे येत असल्याने हे आंदोलन पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात होता.
काय हेक्टर रक्कम टाकली तेच कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधी यांना माहिती नाही. काय गुंठा रक्कम टाकली याचेसुद्धा उत्तर कृषी विभाग व विमा कंपनी देऊ शकत नाही, यामधे सर्व गोंधळ झाला असून, मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.