
डॉ. परदेशींच्या ‘चौकारा’वर आ. बोरनारेंचा ‘षटकार’!
चिकटगावकर शिवसेनेत; एका म्यानात ‘दोन तलवारी’
वैजापूर: तालुक्याच्या राजकारणात ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी फुटलेला ‘पोळा’ आजही काहीअंशी कायम आहे. निवडणूक संपूनही राजकारणातील ‘खलबते’ संपायला तयार नाही. आतातरी हा ‘धुरळा’ खाली बसेल. असे वाटत असतानाच जनतेला धक्क्यावर धक्के बसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका नेत्याचा उबाठा शिवसेनेतून भाजपमध्ये झालेला प्रवेश अन् पुन्हा काही दिवसांतच आता एका माजी आमदारांनी विद्यमान आमदारांचे ‘बोट’ धरून शिंदेसेनेत केलेला प्रवेश सर्वांच्याच भुवया उंचावणारा ठरला आहे. आजी – माजी आमदारांची एका पक्षात ‘इनिंग’ सुरू झाली खरी; परंतु एका म्यानात दोन तलवारी राहतील का? हाच खरा प्रश्न आहे.
वैजापूर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात मोठी उलथापालथ झाली. तालुक्यातील जनतेने ती ‘याची देही, याची डोळा’ अनुभवली. राजकारणातील गलिच्छपणा काय असतो. हे आता झाकून राहिले नाही. स्थानिक पातळीवर नावं ठेवावी. असं काही नाही. वरिष्ठ पातळीवर काय राजकारण चालतं ही स्थित्यंतरे अख्ख्या राज्याने अनुभवली. त्यामुळे सामान्यांनी आता ‘जे – जे होईल, ते-ते पहावं’. एवढंच हाती उरलं आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी वैजापूर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते. भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची आवई उठल्यानंतर उबाठा शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ‘अलर्ट’ होऊन त्यांनी पक्षनेत्यांशी ‘अबोला’ धरला. त्यानंतर त्यांनी पक्षीय कार्यक्रमास ‘दांडी’ मारणे सुरू केले. थोड्या दिवसांनी झालेही तसेच. डॉ. परदेशींच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब होताच चिकटगावकरांनी उबाठाला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत चिकटगावकरांनी शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या तंबूत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत चिकटगावकरांनी बोरनारेंसोबत काम केले. गेल्या काही दिवसांपासून ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसत असले तरी राजकारणात फारशी सक्रियता नव्हती. चिकटगावकरांचा १८ मार्च रोजी मुंबई येथे समर्थक कार्यकर्त्यांसह प्रवेश झाला. चिकटगावकरांच्या पक्षप्रवेशामुळे बोरनारेंना नक्कीच ‘बळ’ मिळणार आहे. त्या दोघांत काय ‘तह’ झाला. हा वेगळा विषय असला तरी चिकटगावकरांनी घेतलेला पक्षप्रवेश हा डॉ. परदेशींना ‘शह’ देण्यासाठीच असल्याचे बोलले जात आहे. २५ फेब्रुवारी उबाठाचे नेते डॉ. दिनेश परदेशी यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करून मुंबईत ‘कमळवासी’ झाले. उबाठातून जाताना त्यांनी अख्खी महाविकास आघाडी ‘खिळखिळी’ करून नावालाच कार्यकर्ते शिल्लक ठेवले. डॉ. परदेशींच्या ‘चौकारामुळे’ राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. असे असताना महिनाभराच्या आतच आमदार रमेश बोरनारेंनी चिकटकगावकरांना ‘गळाला’ लावून उत्तुंग ‘षटकार’ ठोकून ‘हम भी किसी से कम नहीं’ दाखवून दिले. चिकटगावकरांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा शिवसेना व्हाया शिवसेना (शिंदे) असा राहिला तर डॉ. परदेशींचा भाजप, काॅंग्रेस, पुन्हा भाजप, उबाठा शिवसेना व्हाया भाजप असा प्रवास राहिला. परंतु या दोघांचा तुलनेत बोरनारे पहिल्यापासून ते आजतागायत एकाच पक्षात म्हणजेच ‘शिवसेनेतच’ आहे. विधानसभा निवडणुकीत हे तिघेही वेगवेगळ्या दिशेने ‘तोंड’ करून होते. बोरनारे, चिकटगावकर व्हर्सेस डॉ. परदेशी असे चित्र होते. परंतु परिस्थिती आणि वेळ एकत्र यायला भाग पाडते. असं म्हणतात ते काही खोटं नाही. कितीही राजकीय हाडवैरी असू असू देत. परंतु परिस्थितीपुढे सर्वच हतबल असतात. हे तिघेही याचे मोठे उदाहरण म्हणावे लागेल. राजकीय मतभेद भलेही असतील; पण राज्यातील सत्तेत भाजप – शिंदेसेनेची युती आहे. दुर्दैवाने हे तिघेही या मित्रपक्षातील घटक आहेत. त्यामुळे ‘झालं गेलं, गंगेला मिळालं’ विसरून आता इच्छा नसतानाही खांद्याला खांदा लावून काम करावे लागणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या तिघांनाही ‘परफाॅर्मन्स’ दाखविण्याची मोठी संधी आहे.
‘शेवटचा दिस गोड व्हावा’
राजकीय पातळीवरील कारभारात आ. रमेश बोरनारे क्रमांक एकचे नेते असतील तर चिकटगावकरांकडे त्याखालोखाल जबाबदारी राहील. अशीही चर्चा राजकीय वर्तुळात झडत आहे. चिकटगावकर आता ‘थकले’. असं म्हणता येणार नाही. त्यांचा उत्साह, उमेद पाहता ते अजूनही त्यांचा ‘चार्म’ कमी झालेला दिसत नाही. परंतु वयोमानाच्या आकड्याची सत्यता कुणी नाकारू शकत नाही. चिकटगावकरांची एकसष्टी तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी केली गेली. हेच गृहित धरून ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ या उक्तीनुसार त्यांनी राजकारणात