चिखली : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नियतीचा क्रूर आघात सोसूनही, मायेची उब आणि संघर्षाची तलवार हाती घेऊन लढणाऱ्या एका जिद्दी मुलाचा विवाह सोहळा केवळ मंगलमय क्षणांनी नाही, वधू-वराच्या मरणोत्तर देहदानाच्या उदात्त संकल्पाने वऱ्हाड्यांच्या स्मरणात राहणारा ठरला. लग्नगाठ बांधून सातफेरे घेत साताजन्माची शपथ घेणाऱ्या या नवदाम्पत्याने देहदान करण्याचा केलेला संकल्प ‘देहदान करा’ असा संदेश समाजात देऊन गेला.
दिवठाणा येथील विनोद तुकाराम इंगळे आणि कविता तुकाराम मोरे यांचा विवाह १५ मे रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. पण, हा लग्नसोहळा केवळ एका नव्या नात्याची सुरुवात नव्हती, तर समाजासाठी काहीतरी परतफेडीची, माणुसकीची एक अनोखी आणि हृदयस्पर्शी कहाणी होती. या नवदाम्पत्याने आपल्या आयुष्याच्या या शुभ पर्वावर, मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून साऱ्या समाजालाच एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. हे वर आणि वधू एकाच गावातील आहेत. त्यांनी घेतलेल्या दूरदृष्टीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

मायेची उब आणि
संघर्षाचा सोबती
विनोदच्या या खडतर प्रवासात त्याला साथ मिळाली ती त्याच्या आईची. आईने कंबर कसली आणि मुलाला शिक्षण देण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. पण या संघर्षात खऱ्या अर्थाने विनोदला वडिलांची जागा घेऊन उभे राहिलेले त्याचे मोठे बंधू प्रमोद इंगळे आणि आईसारखी माया लावणारी भावजय सुनीता यांची पदोपदी मिळालेली साथ अनमोल ठरली. त्यांच्या अखंड प्रेमाने आणि पाठिंब्यानेच विनोदने शिक्षणाची कास धरली. विनोदने मागील वर्षी अर्थशास्त्रात सेट परीक्षा उत्तीर्ण केली. हा केवळ एक शैक्षणिक टप्पा नव्हता, तर एका संघर्षाचा विजय होता, त्यागाचे फळ होते. वधू कविताने देखील पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन, या प्रवासात विनोदला सक्षम साथ देण्याचे वचन दिले आहे. तिच्या शिक्षणाने आणि विचारांनी विनोदला आणखी बळ मिळाले आहे. पुढे त्याला साथ मिळाली, ती शरदसारख्या लहान भावाची. तो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.
‘आमचा देह लोकांच्या कल्याणासाठी सदैव तेवत राहावा’, हा यामागील नवदाम्पत्याचा प्रामाणिक आणि शुद्ध हेतू आहे. ज्या विनोदने बापाच्या मायेसाठी, बापाच्या आधारासाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्यानेच आपल्या देहातून समाजाला मरणोत्तर आधार देण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे अवयवदान आणि देहदानासारख्या पवित्र कार्याला समाजात अधिक चालना मिळेल, असा विश्वास विनोदने व्यक्त केला.
बापाच्या आठवणीत
समाजासाठी तेवणारी मशाल!
विनोदच्या आयुष्याची गाथा म्हणजे संघर्षाची आणि त्यागाची एक दीर्घ कविता आहे. विनोद अवघ्या पंधरा वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या डोक्यावरील पितृछत्र २००६ च्या त्या भयावह पुरामध्ये हरपले. परिवहन महामंडळात कार्यरत असलेले त्याचे वडील तुकाराम इंगळे महापुरात वाहून गेले. बापाच्या छत्रछायेविना पोरके झालेल्या विनोदने डोळ्यांतील अश्रू पुसत, मोठ्या हिमतीने स्वत:ला सावरले. त्या लहानग्या वयातच बापाविना पोरका झालेला तो समाजासाठी आपल्या देहदानाचा संकल्प करतो, हेच त्याच्या त्यागाचे प्रतीक आहे. बापाची माया, बापाचा आधार काय असतो, हे अनुभवता न आलेल्या विनोदने, मरणोत्तरही समाजाला आधार देण्याचे ठरविले. हे पाहून अनेकांचे मन हेलावले.

